Friday, 3 July 2015

भांडवलशाहीच्या बुरख्याला

भांडवलशाहीच्या बुरख्याला
इंडिया शायनिंग च भूषण
विद्रोही आंबेडकरी विचारांना
मात्र नक्षलवादाच दूषण

उघड्यावर गोळ्या घालता आम्हाला
गाजवून स्वातंत्र्याचा डंका
दोन न्याय दोन कायदे श्रीमंत अन् गरीबा
रे बाबा सांग कुठय तुझी समता
दूर कुठे जळणाऱ्या आया-बहिणींची हाक
आता ऐकूच येत नाही
जात्यामध्ये भरडनाऱ्यासाठी सुपातल्याच
बंधुत्व आता उसळून येत नाही

खूप शिकलो आपण पण
संघठीत झालो का?
संघर्षाची बातच न्यारी
लाचारीतच अडकलो ना?

भाकरीपेक्षा स्वाभिमान प्यारा
कुणीतरी आजहि बोला रे
तुमच्यासाठी खांबावर फाशी जातो
म्हणनारा केव्हाच सोडून गेला रे

गुलामीची तिरडी बिनबोभाट
उचलणारी आमची मान
चळवळीच सिंहासन उचलताना
का झुकावी?
रे बाबा अन्याय अजून होतो आहे
संघर्ष अजून बाकी आहे मग
तुझीच चळवळ अनुयायांना
का मुकावी?

विचारांची लोणची जन्मभर
चवीने मुरवली आम्ही
आचारांची भुकटी मात्र पावलोपावली
वाऱ्यावर उडवली आम्ही

जागे व्हा बंधुत्व जागवा दोस्तहो
हि आपलीच गरज अन् आपलीच चळवळ आहे

एकट्या-दुकट्याला कापून फेकतील हे लोक
अन् हसून म्हणतील किड्या-मुंगीची वळवळ आहे

1 comment:

  1. जात्यामध्ये भरडनाऱ्यासाठी सुपातल्याच
    बंधुत्व आता उसळून येत नाही... best line

    ReplyDelete