Wednesday, 22 July 2015

अचानक

फोन हातात घेऊन चालतोय.
आईशी बोलाव वाटल अचानक...
काय डायल करू.. साला तिचा फोन नम्बरच नाहिये!
:( feeling very sad! And helpless!!!

Saturday, 4 July 2015

आई १

औरंगाबाद ला कॉलेजात शिकत असताना अधून मधून अंबाजोगाई ला घरी येन व्हायच. पण बऱ्याचदा महीनोन महीने मी घरी फिरकायचो नाही. कॉलेज, मित्र, निरनीराळया उचापती यातच मशगूल असायचो.
घरी आल्यावर देखील, लहानपनीचे मित्र खूप दिवसांनी भेटायचे म्हणून दिवस रात्र त्यांच्यासोबत मस्ती चलायची.

रोजच रात्रि घरी परतायला खुप उशीर व्हायचा. माझ्यामागे गेट बंद करायला म्हणून पप्पा जागे राहायचे तर मी जेवतो की नाही हे पाहायला आई जागी असायची.

एक रात्रि नेहमीप्रमाणे मी उशिरा घरी आलो.
घरी कदाचित टिंकुची आवडती बटाटयाची भाजी केलेली असावी. त्याने ती पूर्णच संपवली होती.

आई म्हणाली काही करुन देते. मी नको बोललो व घरात काय असेल ते दे अस सांगितल.

दूध होत. दिवसभर तापुन वापरून घट्ट झालेल दूध.
ते थोड़ गरम करुन पातेल्यातच ज्वारिचि भाकरी मी कुसकरून खाल्ली. आई पहात होती, तिला वाईट वाटत होत की मला कदाचित न आवडनार अस काही खाव लागत आहे.
पण ती दूध भाकरी खरच खूप चविष्ट लागली होती. आधी कधी दूध अस आवडल नव्हतच.
मी आई ला सांगितल की आता रोज रात्रि मी हेच खानार, वेगळ काही करायची गरज नाही. तिला आश्चर्य वाटल, कदाचित अविश्वास देखील.

कसोटी दुसऱ्या रात्रि होती.

पण त्या रात्रिपासून मी रोज भाकरी आणि दुधच खाऊ लागलो. लेट यायच, दूध कड़क तापवायच, त्यात उरलेल्या सर्व भाकरी कुस्करायच्या आणि पातेल चाटून पुसून खायच..

आई पहात असायची. तिच्या चेहऱ्यावर समाधान की काहीतरी दिसल्याच् आता आठवत. मंद हसत ती मला जेवताना पाहायची. उरलेल्या शिळया भाकरीच उद्या काय कराव की नेहमीप्रमाणे स्वत: खावि, उरलेल्या दुधाच उद्या काय कराव या गोष्टींची काळजी तिला कदाचित करावी लागत नसेल. आणि त्यातच ती किती खुश व्हायची. खरच आया वेड्या असतात किती..

तीच ते मंद हसु कदाचित मी त्यावेळिच अनुभवायला हव होत.. पण मी माझ्याच विश्वात हरवलेला असेल तेव्हा.. आता सोबतिला फ़क्त जर-तर आणि उसासे.

आज पुण्यातल्या एका रहदारीच्या रस्त्यालगत फुटपाथवर बसून हे सर्व या ब्लॉग वर उतरवताना, ही जाणीव खुप होतेय की.. इतक्या गर्दीत बसून देखील जानवणाऱ्या एकटेपनातही मला एकट न वाटू देण्याच् सामर्थ्य आहे केवळ तिच्यात!

परीट आणि कोळसेविक्या

एकदा एका गावात एक कोळसेविक्या नवीन जागी दुकान टाकतो. त्याच्या शेजारीच चिकटूनच एका परीटाच दुकान असत. 

साहजिकच शेजारी असल्याने आणि पोटासाठी धंदा करणाऱ्या त्या दोघांची दोस्ती होते. कामानिमित्त त्या दोघांनापण बाहेरगावी जाव लागे. 

चांगली मैत्री झाल्यावर एके दिवशी कोळसेविक्या परिटाला म्हणतो, "मित्रा, आपण दोघेपण बाजारहाटासाठी बाहेरगावी जातो त्यात खर्च तर होतोच पण एकट जायला-यायला कंटाळवाण पण वाटत, जर आपण एकत्र गेलो तर पैशांची पण बचत होईल आणि वेळ पण छान जाईल."

      त्यावर परीट म्हणतो, "तू म्हणतोस ते खर आहे मित्रा पण आपल कामाच स्वरूप काही अस करायला योग्य आहे अस मला वाटत नाही आणि मला वाटत झाली तितकी दोस्ती बस झाली आता आपण दूर राहिलेलच बर."

      परीटाने काही दिवसात ती जागा सोडून नव्या जागी बस्तान हलवले.


- इसापनीती

Friday, 3 July 2015

चार ओळी

ती:
तुला जाणवत का रे...
        चांदण्यांना हि वाटत असेल का
     कधी चंद्राजवळ जाव..?
                दूर असूनही
           फक्त त्याचच रहाव..?

तो:
असच होईल ग..
        मनात आणशील तर,
     हे तारांगण फुलेल तुझ्या अंगणी..
                सौभाग्यवतीच्या कुन्कुवासमान    
           शोभून दिसेल शुक्राची चांदणी...

सखे

सखे,
वाट शोधलिये मी माझी
पण ती इतर कुणाची नाहीये
ध्येय तर दिसतय
मार्ग दिसेना... दिसतात फ़क्त
काटे अन खाच-खळगे
माझी वाट मलाच शोधायचिये... बनवायचीये...
अनंत कष्टाना सामोर जाव लागेल मला
हे करताना...कदाचित
पाय रक्तबंबाळ होतील, हात सोलवटून निघतील...
सखे, घेशील का ग तू ते हात तुझ्या हातात..
एक मायेची फुंकर घालण्यासाठी...
त्या रक्ताळलेल्या पाउलखुणा पाहून
तुझ मन धझावेल का माझी साथ देण्यासाठी...
अन, अडथळा म्हणून जेव्हा येईल
तुझाच इतिहास आपल्या मार्गात
अन माझ्या मनात असेलच करावा
तोही पार, करून त्याच्याशी दोन हात...
सखे, असशील का ग तू... माझ्या सोबत...

माझ्या बाजूलाच...ठाम.?

एक पत्र

गुऱ्या,

काय लिहू कळत नाही..... काहीही लिहायला बसल कि माझी हि सुरवात ठरलेलीच आहे अस वाटायला लागलंय आता.. सगळा पांचटपणा..

अस वाटतंय संपल माझ सगळ बोलून. हे मराठी टायपिंग मस्त आहे, आधी पण वापरलं होत पण विंडोज सेवन मध्ये जास्त फ्रेंडली वाटतंय. असला काहीतरी शोध तुम्ही लावायला पाहिजे होता.
आजपण खूप बोर होत आहे, नेहमीचच झालंय तस... अस लिहायला पण ऑड वाटतंय यार, पेपर घाण करायची मजा वेगळीच असते, इथ कस सगळ सुटसुटीत, मोकळ, स्वच्छ, खोट-खोट.... पेपर मस्त असतो, तो मला माझा वाटतो, जवळचा...माझ्या लाइफ सारखा...कॉम्प्लिकेटेड..आडव्या-तिडव्या रेघोट्या मारता येतात, हवी तिथ हवी तशी गिचमिड करता येते, एकदा शाई उमटली कि झाल, परत माघार नाही, तिला घेऊनच पुढ जाव लागत. शेवटी जे उरणार आहे जे निर्माण होणार आहे त्याचा ती प्रत्येक गोष्ट भाग असते,चांगलीपण वाईटपण... तसच आपल्या आयुष्याच पण आहे न, एकदा गोष्ट घडली कि घडली परत माघार नाही.. वेळ एकदाच येते. त्यात जे होईल ते होईल.. पुढ त्यासोबतच जगाव लागत, खोडरबर नाही ना डिलीट च बटन नाही...रिस्टार्ट तर मुळीच नाही. म्हणून मला पेपर वर पण पेन्सिल आवडते, पण जीवनासोबत ती कधी वापरता आलीच नाही. पण कदाचित त्यामुळंच आयुष्यात मजा असेल.

मॅचुरीटी कधी येईल का रे माझ्यात... का मी असाच आहे आणि असाच असण्यासाठी मी असा आहे? पण मुळात मी का आहे हेच कळत नाहीये मग असा का तसा का काय फरक पडतो, बघायला गेल तर जवाबदारया खूप आहेतच कि, पण कुठ काय गफला होतोय समजत नाहीये. काहीच व्यवस्थित आहे अस वाटत नाहीये. नाहीच आहे....

हे सगल इल्युजन असाव...मला खूप बर वाटेल.

माझ्यात काही स्पिरीट राहीलच नाही अस झालंय, कशात काही अॅम्बिशण राहिलीच नाही, रस राहिला नाही... उगी ढकलत चाललोय स्वतःला. प्रोब्लेम आले फेस करतोच आहे, हातपाय गाळून बसत नाही अजून, पण काहीतरी कमी आहे, खूप महत्वाच काहीतरी मिसिंग आहे आता....

झोपलो आता...झोपून टाईप करतो. बट काय बोलू नाही कळत ए...

आतापर्यंत काहीतरी सेटलमेंट, काहीतरी अचिव्हमेंट पाहिजे होती यार सगळच फिस्कटलय... मोठ्या उमेदीने आलो होतो स्पर्धा परीक्षेची तयारी करायला, स्वतःला बदलायचं होत जग बदलण्यासाठी....सगळच फिस्कटल आता. वेळ आहे अजून पण उमेद नाही ती आता... वाटत कधीकधी सगळ सोडून निघून याव तुमच्याकड पण काय माहित तिथ येऊन पण काय विचार करेन मी आणि काय मिळवेल काय गमावेल. आणि असहि वाटत न कि सोपा पर्याय तर कुणीही निवडेल, पळून जाण तर सोपच आहे, आणि मी स्वतःला-स्वताच्या परिस्थितीला पाठ दाखवून पळालो तर ती जाणीव घेऊन मी निट राहू शकेल का? इकडे काही करू शकलो नाही म्हणून तुझ्या आश्रयाला आलो हि जाणीव घेऊन मी जगू शकत नाही. मला इथच शिकाव लागेल, मी इथ चुकतोय मला इथच सुधाराव लागेल. ते म्हणतात न जे जीथ हरवलं ते तिथच शोधाव लागत.

अस वाटतंय पूर्ण आयुष्य जगलोय मी, काही राहील नाही. ध्येय नसलेल आयुष्य मलाच कधी पटल नाही, ते कधी माझ्या वाट्याला येईल अस वाटल पण नाही. पण आहे....आता.

आई गेली, पण खूप काही देऊन खूप काही शिकवून गेली ती, अखेरच्या काळातही खूप काही दिलं तिने ते मी कस वाया जाऊ देऊ.... तिने विश्वासाने ज्या गोष्टी मला शिकवल्या त्या सोडून कशा देऊ? हरन तिने कधीच शिकवलं नाही, मृत्यू समोर असताना ती कधी मनाने हरली नाही, त्याही परिस्थितीत तिने जिवनाच खूप मोलाचं तत्वज्ञान मला दाखऊन दिल. मला तो वारसा पुढ न्यायचाय.

                       मी..... नक्कीच अस म्हणणार नाही कि खचून जाण्याच्या सगळ्या पायऱ्या मी उतरलोय, त्या नशीबाला म्हणा तुला अजून खूप झटाव लागेल मला तितक् खाली खेचायला आणि तरी तू जिंकशीलच अस नाही. मी इतका सोपा नाही जिंकायला. आहे अजून डोक जागेवर माझ,थोड भटकतय इतकच.

काय सांगू गुऱ्या (मी खूप खुश झालो होतो जेव्हा हे गुऱ्या जी यु आर वाय ऐ टायीप केल कि हव तस प्रिंट झालेलं पाहून)
माझ्या डोक्यात इतका कचरा झालाय ना कि कामाच्या गोष्टी काढून मी त्यावर लक्ष केंद्रित नाही करू शकत आहे, कामाची गोष्ट बाहेर काढली ना कि ती या कचरयानि बरबटलेलीच असते. बळजबरी मी मनावर ना कधी करू शकलोय ना अजूनही करू शकेल अस वाटतंय. मनाविरुद्ध नाही वागता येत मला, आणि जर वागलोच तर त्याचा उपयोग होत नाही, फक्त वेळ वाया गेलेला असतो मग. पूर्ण तयारीने, पूर्ण ताकद लावून नाही रे मी अजून या परीक्षा देऊ शकलो, नेहमी काहीतरी कारण आहेच, या कारणांना मीच कंटाळलोय. ज्या ताकदीने ज्या उमेदीने आपण सोबत असताना काही गोष्टी करायचो, तहान-भूक विसरून फक्त त्याच गोष्टीचा ध्यास असायचा, झोपेत जागेपणी तेच विचार, काम कस तडीस नेता येयील, कस ते परिपूर्ण राहील... तस मी अजूनही नाही स्वतःला पाहू शकलो इकडे...त्याच्या अर्धदेखील नाही. तो वेडेपणा कुठ हरवलाय कि.... खूप गरज आहे त्याची.
विचार करून, सल्ले घेऊन, प्लान करून हाती काही लागत नाहीये, फिझीकल सिग्निफिकंस असलेल एखाद माझ बटन हरवलय आणि तेच प्रेस करायची गरज आहे.. इतर काहीही वर्क नाही करत आहे.
पण मी करणार आहे, मला माहित नाही कस ते, पण मी मधेच सोडणार नाही.... वेळ लागेल कदाचित, पण मला माझा मार्ग स्वतालाच काढावा लागेल. माझा कागद चुकांनी कितीजरी भरून गेला तरी त्या रेघोट्याना पुढ नेवून त्यापासूनच एक छानस चित्र मला उभ करायचय. आज दिसत नसल तरी ते त्या चुकांमधेच लपलेल असाव......

                                                मी परत सुरवात करतोय....



मला अजून बोलाव वाटतंय पण काय ते नाही सुचत, सो थांबतो....

भांडवलशाहीच्या बुरख्याला

भांडवलशाहीच्या बुरख्याला
इंडिया शायनिंग च भूषण
विद्रोही आंबेडकरी विचारांना
मात्र नक्षलवादाच दूषण

उघड्यावर गोळ्या घालता आम्हाला
गाजवून स्वातंत्र्याचा डंका
दोन न्याय दोन कायदे श्रीमंत अन् गरीबा
रे बाबा सांग कुठय तुझी समता
दूर कुठे जळणाऱ्या आया-बहिणींची हाक
आता ऐकूच येत नाही
जात्यामध्ये भरडनाऱ्यासाठी सुपातल्याच
बंधुत्व आता उसळून येत नाही

खूप शिकलो आपण पण
संघठीत झालो का?
संघर्षाची बातच न्यारी
लाचारीतच अडकलो ना?

भाकरीपेक्षा स्वाभिमान प्यारा
कुणीतरी आजहि बोला रे
तुमच्यासाठी खांबावर फाशी जातो
म्हणनारा केव्हाच सोडून गेला रे

गुलामीची तिरडी बिनबोभाट
उचलणारी आमची मान
चळवळीच सिंहासन उचलताना
का झुकावी?
रे बाबा अन्याय अजून होतो आहे
संघर्ष अजून बाकी आहे मग
तुझीच चळवळ अनुयायांना
का मुकावी?

विचारांची लोणची जन्मभर
चवीने मुरवली आम्ही
आचारांची भुकटी मात्र पावलोपावली
वाऱ्यावर उडवली आम्ही

जागे व्हा बंधुत्व जागवा दोस्तहो
हि आपलीच गरज अन् आपलीच चळवळ आहे

एकट्या-दुकट्याला कापून फेकतील हे लोक
अन् हसून म्हणतील किड्या-मुंगीची वळवळ आहे

धर्मनिरपेक्षता : एक पुनर्विचार


'धर्म हि एक अफूची गोळी आहे', अस म्हणणाऱ्या मार्क्स ला जर कुणी विचारल असत कि खरच धर्मनिरपेक्षतेवर पुनर्विचार करण्याची गरज आहे का? तर कदाचित अस उत्तर मिळाल असत कि, मुळात जिथे धर्मच अस्तित्वात नसावा तिथ धर्मनिरपेक्षता कशासाठी.? आणि मग धर्मनिरपेक्षतेचा विचारच जर नाहीये तर पुनर्विचार कशासाठी?
     
परंतु स्वतंत्र भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे, मनुष्याला जगण्यासाठी आणि नुसतच जगण्यासाठी नाही तर सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी धर्माची गरज आहे. याच विचारधारेतून डॉ.आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेची बीजे भारतीय संविधानात रोवली.

     'कुठलाही धर्म उच्च नाही कि नीच नाही, कुठलाही धर्म राष्ट्रीय नाही, कायद्यासमोर सर्व धर्म समान आहेत. परस्परांच्या धर्माविषयी आदरभाव राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.' अशा या वरवर प्रगल्भ वाटणाऱ्या धर्मनिरपेक्षतेविषयी पुनर्विचार करण्याची गरज पडावी यातूनच एक विचार सहज मनात येतो कि, महापुरुषांकडून मिळालेल्या, मानवी वारसा असणाऱ्या श्रेष्ठ विचारांवर देखील व्यक्तीसापेक्षता व कालसापेक्षतेच्या मर्यादा पडू शकतात.

     भारताच्या बाबतीत म्हणले जाते कि, जिथे विविधतेमध्ये एकता नांदते तो सुजलाम सुफलाम देश म्हणजे भारत!! हि विविधतेत एकता....एकदा निट समजून घेतली पाहिजे.

     भारतात विविध जाती, धर्माचे, पंथांचे लोक राहतात, आणि ते परस्परांच्या भावनांचा आदर करून एकोप्याने राहतात अस या विधानातून दिसून येत.
पण मुळात जिथ इतक्या प्रकारचे जात, धर्म, पर्यायाने विचार, श्रद्धा, अस्तित्वात आहेत तिथ एकोपा, वास्तविकतेत व दृश्य स्वरुपात येणे जवळपास अशक्यप्राय गोष्ट वाटते.
    
एका व्यक्तीसाठी असलेली श्रद्धा जर दुसऱ्यासाठी अंधश्रद्धा ठरत असेल तर या दोन व्यक्तींमध्ये दिसणारा एकोपा हा वरवरचा आहे हे स्पष्ट होत. मुळात या दोन व्यक्तींचे धर्म म्हणजेच जीवन जगण्याच्या कलाच जर वेगवेगळ्या असतील तर तत्वांना मुरड घालून स्वत:ला फसवण्यात काय अर्थ आहे. परीट व कोळसेविक्या कितीही जिवलग मित्र असले तरीही वास्तव जीवनात हि मैत्री त्यांना हानिकारकच ठरते. (इसापनीती)
प्रत्यक्षात गरज आहे ती या धर्मांना चिकित्सक वृत्तीने अभ्यासण्याची, वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्याची. या चाचण्यांमधून जो धर्म वा धर्माचा भाग उत्तीर्ण होईल तोच धर्म अन फक्त तोच धर्म आपणा सर्वांना खरा न्याय देऊ शकेल, धर्मनिरपेक्षतेचा!!
पण जिथे धर्माची कृतीशील चिकीत्साच अमान्य करण श्रद्धा बनली असेल तिथे सद्सद्विवेकबुद्धीचा आग्रह करण अवघड होत. आपला धर्म आपली संस्कृती यावर असलेला श्रद्धेचा निखारा अंधश्रद्धेच्या राखेखाली जातोय याची जाणीवच बोथट होतेय, कसल्या संस्कृती अन कसल्या रुढी परंपरांच माथेर घेऊन फिरतोय आपण.. तीच संस्कृती जिथे माणसाला माणसासारख जगण्याचा अधिकार नाकारला जात होता? माणसानं माणसाशी माणसासारख वागाव हे जिथे हजारो वर्षे पाप मानले जात होते. त्याच भारताविषयी आपण म्हणतो कि, "इथ विविधतेत एकता नांदते, आम्हाला आमच्या या संस्कृतीचा अभिमान आहे, आमच्या रुढी परंपरा आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या आहेत, त्या बरोबरच आहेत अन राहणार आहेत". अशा प्रकारचे तुंबून बसलेले विचार जोपर्यंत मोकळे होत नाहीत तोपर्यंत खरी धर्मनिरपेक्षता दिसून येणे शक्य नाही. कारण एका समुहाची अभिमानास्पद गोष्ट इथे दुसऱ्या समूहासाठी अपमानास्पद इतिहासाची कहाणी आहे.

     सर्वत्र केल जात, सर्वकाळ केल गेल आहे म्हणून ते बरोबरच अस कस ठरू शकत? गल्लीपासून दिल्लीपर्यंत लोक व्यसनही करतात म्हणून त्यांना का आपण चांगली गोष्ट म्हणणार? एक धर्म सांगतोय जत्रेत कोंबडी कापा, गायी गुरे कसायाच्या हाती द्या अन एखादा धर्म सांगतोय हिंसा करू नका, अहिंसा पाळा तर मग ऐकावं कुणाच आणि यांनि सोबत कस राहावं? कि हि असली धर्मनिरपेक्षता जागवत उघड्या डोळ्यांनी सर्व सोसत स्वमनाची हिंसा चालू द्यावी.?

हि परस्परविरोधी कृत्ये आपला घात करत असताना, आपल्या श्रद्धांवर तत्वांवर कुऱ्हाड पडत असताना, आपल्या अंतर्मनावर होणारे आघात सहन करत हातावर हात ठेऊन जे होत आहे ते पाहत राहणे म्हणजे जर धर्मनिरपेक्षता असेल तर काय कामाची ती धर्मनिरपेक्षता? मुळात ज्या गोष्टी आदर्श मानवी वर्तन असतात, ज्या व्यक्ती वा कालसापेक्ष परिघात बंदिस्त नाहीत, अशा गोष्टींवर श्रद्धा ठेऊन अशा तत्वांना धर्म मानून जर आपण वागलो तर आपण खरच मनुष्यात्वाच्या व्याखेत बसू.
'सर्व धर्म सारखे आहेत, सर्वांच ध्येय एकाच आहे' अस म्हणनं म्हणजे त्या सर्व धर्मांचाही अवमान आहे ज्यांच्या मूळ तत्वावरच हे वाक्य घाला घालत असत. एक धर्म सांगतो मारा आणि एक धर्म सांगतो वाचवा आणि आपण म्हणतो हे दोन्ही धर्म एकाच निर्मिकाकडे जातात...हे कस शक्य आहे?

     एकेश्वरवाद, अनेकेश्वरवाद, निरीश्वरवाद यात आपली मान अडकली असताना धर्मनिरपेक्षतेच्या वरवरच्या 'इंडिया शायनिंग' सारख्या पोकळ गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. जोपर्यंत द्रुष्ट, जाचक समजुतींना मुठमाती देऊन विज्ञानाची कास धरून स्वताला जे पटेल, जे जनहितार्थ असेल ते आपण आचरणात आणत नाही तोपर्यंत आपण आपली अन पर्यायाने समाजाची उन्नती साधू शकत नाही.

     धर्म मानसासाठी आहे कि माणूस धर्मासाठी, हा विचार करताना धर्मच ईश्वरनिर्मित आहेत अस मानणारे आपण हे कस मान्य करू कि धर्मातील ज्या भ्रामक समजुती  मानवतेला काळीमा फासणाऱ्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत, कारण जे धर्मात आहे ते स्वयंभू आहे, परिपूर्ण आहे, ईश्वरेच्छा आहे याच श्रद्धेला(?) आव्हान देण्यास आपली मन धजत नाहीत.

प्रथम पसंती धर्म - रुढींना द्यावी कि मानवी जीवन व जीवनमूल्यांना द्यावी या प्रश्नावर जर मनात गोंधळ निर्माण होत असेल तर खरच एका विचार परिवर्तनाची गरज आहे अस म्हणल तर वावग ठरू नये.

     मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली मूळ तत्वे, जीवनमूल्ये जर प्रत्येक मानवासाठी सारखी असतील तर एक दिवस असा का येऊ नये कि सर्व जाती-धर्मातील लोक एकाच विचाराचे असतील. त्या विचारांच्या, मूल्यांच्या एकत्रीकरनाला मग भलेही कुठल्याही धर्माचे नाव असो. आज मूळ गाभ्यातील गोष्टींना मूठमाती देऊन आपण वरवरच्या नावासारख्या गोष्टींवरच भांडत बसतो. आज धर्मांच्या गोष्टी सापेक्ष होत आहेत, या गोष्टीचा विचार करण्याची खरी गरज आहे. वरच्या फांद्या छाटत बसण्यापेक्षा समस्यांच्या मुळावर हल्ला करणे श्रेयस्कर आहे, पण या सर्व गोष्टी आपण तेव्हा मनावर घेऊ जेव्हा खरच म्हणू कि यापेक्षा अजून 'चांगल' असू शकत, याला 'चालवून घ्यायची' गरज नाही आहे. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेऊन आपण सर्व मानवजातीचा विचार करू तेव्हा या समस्या, समस्या राहणार नाहीत.

     आता गरज आहे ती विचारमंथनाची, परिवर्तनाची, मूळ मानवी मूल्यांसाठी झगडण्याची आणि हे करण्यासाठी लागेल नकार अन् स्वीकाराचा स्वीकार करण्याची वृत्ती, संवेदनशीलता, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती तेव्हाच आपण असा मानव म्हणवू ज्याचा धर्म फक्त आणि फक्त 'मानवता' आहे.
             
(एप्रिल २००९)